शब्द म्हणजे कागदावर ओढलेल्या रेघोट्याच फक्त.
त्यामध्ये थोडीशी भावनांची शाई मिसळल्यावर बनते एखादी कविता.
आणि कवीचं कवीपण तेव्हाच ज्यावेळी त्याची कविता केवळ त्याची न राहता तिचा आस्वाद घेणाऱ्या रसिकांची होऊन जाते..
या ब्लॉगवरील माझी प्रत्येक कविता तुम्हांला तुमच्या जवळची वाटावी, एवढीच सरस्वती मातेच्या चरणी प्रार्थना..

Thursday 31 December 2015

एक सेल्फी !!!


एक सेल्फी काढला सहज एकविसाव्या शतकासोबत
सेल्फीमध्ये आमच्यासोबत बरेच काही दिसत होते !
काही सवयी ओठ दाबून pout वगैरे करत होत्या
आणि काही संस्कार तेव्हा तोंड दाबून हसत होते !!

एक सेल्फी काढला सहज एकविसाव्या शतकासोबत
ब्लू डेनिम जीन्स त्यात style बद्दल बोलत होती
जितकी महाग, जितकी मळकी, तितका जास्त भाव खात
स्त्री - पुरुष समानतेच्या गप्पागोष्टी करत होती !

एक सेल्फी काढला सहज एकविसाव्या शतकासोबत
सर्दी व्हावी तसं आता प्रेमसुद्धा होत आहे !
शाळेपासून सुरु होतं, लग्नाआधी संपून जातं
थडग्यावरती status मात्र single असाच राहत आहे

एक सेल्फी काढला सहज एकविसाव्या शतकासोबत
वडीलधाऱ्या अवलियांचे भव्य पुतळे आहेत इथे
रोज आम्ही येता जाता नमस्कारही करतो त्यांना
ठाऊक नाही एवढंच, 'त्यांचे अमर विचार मेले कुठे ?'

एक सेल्फी काढला सहज एकविसाव्या शतकासोबत
मंगळावरची मोहीम आपली अशी कशी विसरून चालेल ?
हेही खरे, एकीकडे भृणहत्या, बलात्कार,
शेतकऱ्याचं मरण.. असो, एवढं कोण लक्षात ठेवेल ?

एक सेल्फी काढला सहज एकविसाव्या शतकासोबत
कानांमधले rap अगदी फोटोतसुद्धा वाजत होते
मात्र जेव्हा एकटा एकटा दुःखी होऊन रडलो होतो
पाठीवरून classical चे सात हात फिरत होते

एक सेल्फी काढला सहज एकविसाव्या शतकासोबत
संस्कारांना नाविन्याची जोड देऊन पाहू म्हणतो
पंख आहेत विज्ञानाचे, उडणं आहे माझ्या हाती
जमिनीला आकाशाची ओढ लावून पाहू म्हणतो

No comments:

Post a Comment