शब्द म्हणजे कागदावर ओढलेल्या रेघोट्याच फक्त.
त्यामध्ये थोडीशी भावनांची शाई मिसळल्यावर बनते एखादी कविता.
आणि कवीचं कवीपण तेव्हाच ज्यावेळी त्याची कविता केवळ त्याची न राहता तिचा आस्वाद घेणाऱ्या रसिकांची होऊन जाते..
या ब्लॉगवरील माझी प्रत्येक कविता तुम्हांला तुमच्या जवळची वाटावी, एवढीच सरस्वती मातेच्या चरणी प्रार्थना..

Thursday 11 February 2016

तुझ्यावर ?.. कविता ?..


तुझ्यावर ?.. कविता ?..
सोप्पंय !..
तू म्हणजे एक फूल आहेस
चाफ्याचं.. किंवा गुलाबाचं..
किंवा त्याहीपेक्षा श्रेष्ठ !
ज्याचा शोधही लागला नाहीये असं..

तुझा एक मोहवणारा सुगंध आहे
मोगऱ्यासारखा.. किंवा रातराणीसारखा..
किंवा त्याहीपेक्षा श्रेष्ठ !
ज्याचा शोधही लागला नाहीये असा..

तुझा एक अप्रतिम रंग आहे
ऑर्चिडसारखा.. किंवा ट्युलिपसारखा..
किंवा त्याहीपेक्षा श्रेष्ठ !
ज्याचा शोधही लागला नाहीये असा..

तू म्हणजे..
...
...
...
शब्द हरवले वाटतं..
विचार हरवले कदाचित..
मीच हरवलो बहुतेक
तुझ्यावर कविता करण्याच्या नादात !..
..
..
कविता ?.. तुझ्यावर ?..
कविता फुलावर करता येईल गं..
वसंतावर नाही !..