शब्द म्हणजे कागदावर ओढलेल्या रेघोट्याच फक्त.
त्यामध्ये थोडीशी भावनांची शाई मिसळल्यावर बनते एखादी कविता.
आणि कवीचं कवीपण तेव्हाच ज्यावेळी त्याची कविता केवळ त्याची न राहता तिचा आस्वाद घेणाऱ्या रसिकांची होऊन जाते..
या ब्लॉगवरील माझी प्रत्येक कविता तुम्हांला तुमच्या जवळची वाटावी, एवढीच सरस्वती मातेच्या चरणी प्रार्थना..

Thursday 3 December 2015

सोबत तुझा नकार...


ओळखलंस का याला ? हा तो तू दिलेला नकार
एका शब्दात आकांक्षांची सरळसोट शिकार
तू दिलंस काहीतरी, म्हणून ठेवला जपून
आतल्या आत चिडून आणि वरती वरती हसून

माझ्याचकडे असतो हल्ली - आम्ही सोबत राहतो

एकमेकांच्या हातांवरच्या फाटक्या रेषा पाहतो
वाटत नाही एकटं एकटं, बोअर होत नाही
आता आम्ही एकमेकांशिवाय राहत नाही

घर, दार, बाजार, ऑफिस, निर्जन वाटेवर

हल्ली सगळीकडे असतो माझ्याच बरोबर
माझ्या इवल्या जगात मीही त्याला वागवतो
माझी दुःखे त्याच्यापाशी बोलून दाखवतो

मोकळं मोकळं वाटतं जरा, मन हलकं होतं

माझं रडणं त्याच्यासोबत शेअर करता येतं
नवनवीन विषयांवरती गप्पा मारत बसतो
तो फक्त ऐकतो आणि मी फक्त बोलतो

इतकं विश्वासार्ह आधी भेटलंच नव्हतं कोणी

इतकं आपुलकीने कधी वागलंच नव्हतं कोणी
त्याचा जळता हात धरून हळूहळू चालतो आहे
भस्म होतोय आनंदाने, खरं जगणं जगतो आहे

नकार दिलास तू, म्हणून इतकं शिकलो मी

भिडलं कोणी खोल, म्हणून घडू शकलो मी
उपकार झाले, मानला तुझा दातृत्वाचा प्रकार
दिगंताची वाट माझी - सोबत तुझा नकार .. 

No comments:

Post a Comment