शब्द म्हणजे कागदावर ओढलेल्या रेघोट्याच फक्त.
त्यामध्ये थोडीशी भावनांची शाई मिसळल्यावर बनते एखादी कविता.
आणि कवीचं कवीपण तेव्हाच ज्यावेळी त्याची कविता केवळ त्याची न राहता तिचा आस्वाद घेणाऱ्या रसिकांची होऊन जाते..
या ब्लॉगवरील माझी प्रत्येक कविता तुम्हांला तुमच्या जवळची वाटावी, एवढीच सरस्वती मातेच्या चरणी प्रार्थना..

Thursday 24 December 2015

पहिलं प्रेम...



आषाढ वगैरे काही नसताना
पावसाची एखादी सर
अंगणात येऊन धिंगाणा घालून जावी,
तशीच काहीशी आली होतीस तू
माझ्या हृदयाच्या अंगणात..

'आपल्या अंगणात पावसाला तोटा नाही'
हे पाहून मलाही जरा बरे वाटले
मग मी खूप प्रयत्नांनंतर काही फुलझाडांच्या बिया
अंगणात रुजविण्यासाठी आणल्या
आषाढाला अजून अवकाश होता
पावसाने खात्री दिलीच होती
अंगणही अगदी तयार होते
मग मी त्या फुलझाडांच्या बिया
माझ्या अंगणात व्यवस्थित रुजवून टाकल्या
आणि तुझ्या त्या एका सरीचे साठवलेले पाणी
रोज थोडे थोडे अंगणाला देऊ लागलो

काही दिवसांनी त्या बियांतून छोटे छोटे अंकुर बाहेर आले
प्रेमाच्या शिडकाव्यानंतर कागदातून जसे शब्द फुटतात ना -
अगदी तसे..
अंगण आता हिरव्यात शिरू पाहत होते
मधूनच एखादा पक्षी यायचा 
'चला, श्रावणाची सोय झाली', असं म्हणून
एक मस्त जांभई देऊन भुर्रकन निघून जायचा
कधी फुलपाखरं यायची
आणि एखादा अंकुर बुक करून
आपल्या असामान्य सौंदर्याचं
टोकन देऊन निघून जायची
अंगणाला भलताच भाव आला होता
रोपटी हळूहळू माना वर काढत होती
मी तुझ्या सरीचे साठवलेले पाणी
अगदी नेमाने त्यांना देत होतो
एक दिवस त्या रोपट्यांना सुंदर सुंदर कळ्या आल्या
उत्कटतेच्या झाडाला कविता लगडतात ना -
अगदी तशा..
रोपट्यांच्या हिरव्यागार मिठीत त्या रंगीबेरंगी कळ्या
अगदी लाजऱ्याबुजऱ्या वाटत होत्या
पक्षी चक्कर मारायचेच अनेकदा
आणि फुलपाखरं जरा दुरूनच
कळ्या उमलण्याची वाट बघायची
पण साठवलेलं सरीचं पाणी आता संपत होतं
आणि गरज होती तुझ्या एका आषाढाची
तुझ्या आषाढाने माझ्या अंगणाची बाग होणार होती
तुझ्या आषाढाने माझ्या अंगणात पक्षी येणार होते
तुझ्या आषाढाने माझं अंगण पूर्ण बदलणार होतं

समजायला उशीर गेला
पण उशिरा का होईना, एवढं नक्की समजलं
की तुझा आषाढ मुळात माझ्या कॅलेंडरमध्ये नव्हताच ..
चैत्रापासून फाल्गुनपर्यंत माझ्या ललाटावर
फक्त ग्रीष्म आणि ग्रीष्मच लिहिला होता
खूप सुख शोधणाऱ्या माणसाच्या आयुष्यात
शेवटी गझलाच येऊन बसतात ना -
अगदी तसं..

पाणी हळूहळू संपून गेलं, अंगण हळूहळू कोरडं झालं
झाडं जळली, कळ्या सुकल्या, लाजत लाजत मरून गेल्या
पक्षी गेले, फुलपाखरंही दुरूनच निघून गेली
अंगणामध्ये भेग पडली, हृदयामध्ये दाटून आली

त्याच कोरड्या अंगणामध्ये रुजलेले हे शब्द
त्याच भस्म झाडावरती लगडलेली ही कविता
आजसुद्धा जेव्हा तुझा झगमगणारा ग्रीष्म बघतो,
flashback मध्ये जातं मन
अंगण होतं हिरवंगार
माती होते ओलीचिंब
आणि आठवून जातं क्षणार्धात
की आषाढ वगैरे काही नसताना
पावसाची एखादी सर
अंगणात येऊन धिंगाणा घालून जावी,
तशीच काहीशी आली होतीस तू
माझ्या हृदयाच्या अंगणात..

No comments:

Post a Comment