शब्द म्हणजे कागदावर ओढलेल्या रेघोट्याच फक्त.
त्यामध्ये थोडीशी भावनांची शाई मिसळल्यावर बनते एखादी कविता.
आणि कवीचं कवीपण तेव्हाच ज्यावेळी त्याची कविता केवळ त्याची न राहता तिचा आस्वाद घेणाऱ्या रसिकांची होऊन जाते..
या ब्लॉगवरील माझी प्रत्येक कविता तुम्हांला तुमच्या जवळची वाटावी, एवढीच सरस्वती मातेच्या चरणी प्रार्थना..

Monday, 27 February 2017

जन्म आपल्या मराठीचा !..
आपल्या तेजस्वी कांतीवर माधुर्याची तलम वस्त्रे लेऊन तऱ्हेतऱ्हेचे भावजडीत शब्दालंकार परिधान करून प्रसन्न, हसऱ्या चेहऱ्याने मला भेटते माझी भाषा.. कधी कठोर, तितकीच मृदू माता होऊन.. कधी अवखळ, अगदी नखरेल प्रेयसी होऊन.. तर कधी माझे वैफल्य छातीशी कवटाळून घेणारी समजूतदार सहचारिणी होऊन...

Friday, 23 December 2016

त्या गजबजलेल्या ATM मध्ये!!!

ही कविता मला सुचली
त्या गजबजलेल्या A.T.M. मध्ये !
आणि तिला दिली दाद
एका अशा यंत्राने,
ज्याच्याकडे देण्यासाठी दुसरे काहीच नव्हते
-अगदी पैसेही !..

विनवणी करून पहिली मी त्याला !
म्हटलो, 'अरे खिशात आता दमडासुद्धा शिल्लक नाही
पोटापाण्यापुरती तरी कृपा करशील का?'
त्यावर तेही scenty झालं
आणि दिल्या काढून लगेच
कोऱ्याकरकरीत 'शुभेच्छा' !
बोललं, "आता पोटात माझ्या नोटा काही शिल्लक नाहीत
मात्र मनामधून थोड्या शुभेच्छा तर देऊ शकतो
जगण्यासाठी तुला..
तुम्हां माणसांमध्ये तशी शुभेच्छांना किंमत नसेल
पण एकदा शुभेच्छा या स्वतःसाठी खर्चून बघ !
नोटांसोबत मैत्री केलीस, शेवटी त्यांनी दगा दिला
मी म्हणतोय म्हणून आता शुभेच्छाही वापरून बघ !!"

A.T.M. च्या दारामधून बाहेर पडत होतो तेव्हा
हिरमुसलेली रांग सारी भविष्यातला सूर्योदय
लख्ख उजळून देण्यासाठी आज एका अंधारलेल्या
काळ्याकुट्ट क्षणामधून सावरू पाहत होती
A.T.M. ने मनापासून दिलेल्या त्या शुभेच्छांना
देशासाठी धडधडणाऱ्या सहनशील काळजामध्ये
आपल्या आपल्या पद्धतीने घेऊन जात होती...

ही कविता मला सुचली
त्या गजबजलेल्या A.T.M. मध्ये..
आणि तिला दिली दाद
एका अशा यंत्राने,
ज्याच्याकडे देण्यासाठी दुसरे काहीच नव्हते
-अगदी पैसेही... 

Saturday, 16 July 2016

व्यसनाधीन .. तुझ्या डोळ्यांच्या ...


ही कसली जादू ? कसली धुंदी ? तारे गाती !
तू नाहीस आली, मी एकाकी हळव्या राती
स्वतःचाही कुठे उरतो मी शेवटी ?
चंद्राच्या साक्षीने होतो मी शेवटी 
व्यसनाधीन .. तुझ्या डोळ्यांच्या ... 
व्यसनाधीन .. तुझ्या डोळ्यांच्या ... 

मी झुरतो आहे आठवणींच्या नाजुक विश्वामध्ये 
का छळते आहे सखये इतुकी मदनाला दमनामध्ये ?
ये आता साऱ्या मर्यादांना ठेऊन मागे 
घे जुळवून आणि दोन मनांशी रेशीमधागे 
हृदयाची मागणी करतो मी शेवटी 
चंद्राच्या साक्षीने होतो मी शेवटी 
व्यसनाधीन .. तुझ्या डोळ्यांच्या ... 
व्यसनाधीन .. तुझ्या डोळ्यांच्या ... 

तू येशील जेव्हा, होशील जेव्हा कवितेची आशयवाणी, 
मी गाईन तेव्हा तू नसताना भिजलेली माझी गाणी 
का आकाशाने क्षितिजाच्याही पास नसावे ?
का प्रेम असुनही माझ्याहून तू दूर असावे ?
सजणाच्या अंगणी तू यावे शेवटी 
चंद्राच्या साक्षीने मी व्हावे शेवटी 
व्यसनाधीन .. तुझ्या डोळ्यांच्या ... 
व्यसनाधीन .. तुझ्या डोळ्यांच्या ...