शब्द म्हणजे कागदावर ओढलेल्या रेघोट्याच फक्त.
त्यामध्ये थोडीशी भावनांची शाई मिसळल्यावर बनते एखादी कविता.
आणि कवीचं कवीपण तेव्हाच ज्यावेळी त्याची कविता केवळ त्याची न राहता तिचा आस्वाद घेणाऱ्या रसिकांची होऊन जाते..
या ब्लॉगवरील माझी प्रत्येक कविता तुम्हांला तुमच्या जवळची वाटावी, एवढीच सरस्वती मातेच्या चरणी प्रार्थना..

Thursday, 17 December 2015

थोडं बोललीस, उपकार झाले !



थोडं बोललीस, उपकार झाले
अगदी एवढंच हवं होतं !
जितकं बोललीस, मोजता येईल
तरी तेवढंच हवं होतं !!

थोडं बोललीस, उपकार झाले

अबोलपणा टोचत होता
एकटेपणा निघून गेला,
डोक्यावर जो नाचत होता !

थोडं बोललीस, उपकार झाले
केवढं सुंदर बोलतेस तू !
(काय बोललीस, ठाऊक नाही)
तरीदेखील कळतेस तू !

थोडं बोललीस, उपकार झाले
आता मला समजतंय
ओठ बोलतात तुझे
तरी डोळ्याचंच उमजतंय !

थोडं बोललीस, उपकार झाले
बोललो मीही तुझ्याशी
'हाय', 'बाय' ओठावर
अन् बाकी सारं मनाशी !

थोडं बोललीस, उपकार झाले
दोन्ही कान वापरले
दोन्हींमधून साठवलेले
आतल्या आत हरवले !

थोडं बोललीस, उपकार झाले
माहीत झालं मलाही
नशेत असतो माणूस तेव्हा
सुचत नाही जराही !

थोडं बोललीस, उपकार झाले
सुख होतं निसटलं 
आकाश पाताळ एक केलं 
शेवटी तुझ्यात सापडलं !

थोडं बोललीस, उपकार झाले
लक्षात ठेविल जमेल ते
निम्मं हृदय चेहऱ्यात गेलं 
निम्म्यामध्ये बसेल ते !

थोडं बोललीस, उपकार झाले
मुद्दा नव्हतं बोलण्याला
विषय नसतोच काही 
केवळ आशय असतो प्रेमाला !!

No comments:

Post a Comment