शब्द म्हणजे कागदावर ओढलेल्या रेघोट्याच फक्त.
त्यामध्ये थोडीशी भावनांची शाई मिसळल्यावर बनते एखादी कविता.
आणि कवीचं कवीपण तेव्हाच ज्यावेळी त्याची कविता केवळ त्याची न राहता तिचा आस्वाद घेणाऱ्या रसिकांची होऊन जाते..
या ब्लॉगवरील माझी प्रत्येक कविता तुम्हांला तुमच्या जवळची वाटावी, एवढीच सरस्वती मातेच्या चरणी प्रार्थना..

Thursday 5 November 2015

भारतमातेसोबतची बोलणी

भारतमातेसोबत आमची बोलणी सुरु आहेत
तिला म्हणे दहशतवाद्यांना मोठ्ठी शिक्षा द्यायचीये
राजकारणाचे कारण तिला अजून समजलेले नाही
वशिल्यांच्या जत्रेमध्येच ती हरवली आहे
इथल्या खेड्यांसाठी ती हमसून हमसून रडते
तिच्या अश्रूंशिवाय तिथे पाणीच दिसत नाही
तिचे नेते स्विस बँकेत तिलाच गहाण ठेवतात
तिचा जयजयकार फक्त सभांपुरताच राहतो
एरवी तिला कोणी कुत्रेसुद्धा विचारत नाही
तसे विचारण्यासारखे तिच्याकडे आहे तरी काय?
थोडी जमीन, दऱ्याखोऱ्या आणि खूप सारा काळा धूर…
भारतमातेसोबत आमची बोलणी सुरु आहेत
तिला म्हणे गरिबांसाठी स्वतः सुंदर बनायचंय
शेतकऱ्यांच्या मातीवर चालवायचाय सोन्याचा नांगर
आणि सोनं पिकवून तिला पुन्हा सोन्याचा धूर बघायचाय
अरे, ज्यांचे व्याजाशिवाय दुसरे काहीच वाढत नाही
अशी कर्जबाजारी माणसं म्हणे तिला हसताना पाहायचीयेत
ज्यांना सरकार विषाशिवाय दुसरे काहीच देत नाही
अशा शेतकऱ्यांच्या हातात तिला खेळवायचेत रोख पैसे
जरी मोठ्या बाता मारते आमची भारतमाता,
खर्चण्यासाठी तिच्याकडे असे आहे तरी काय?
थोडी जमीन, दऱ्याखोऱ्या आणि खूप सारा काळा धूर…
भारतमातेसोबत आमची बोलणी सुरु आहेत
तिच्या डोळ्यांत लोकांसाठी बरीच स्वप्ने होती
तिचा आरोप – आपण धूळ फेकली त्याच डोळ्यांत
तिची व्यथा – इथे तिला गरिबी बघवत नाही
तिचे दुःख – तिला काहीच बदलता येत नाही
तिचा राग – तिला व्यक्तच करता येत नाही
ती म्हणाली, प्रगतीच्या बदल्यात ती काहीही देईल आम्हांला
पण देण्यासारखे तिच्याकडे असे आहे तरी काय?
थोडी जमीन, दऱ्याखोऱ्या आणि खूप सारा काळा धूर…