शब्द म्हणजे कागदावर ओढलेल्या रेघोट्याच फक्त.
त्यामध्ये थोडीशी भावनांची शाई मिसळल्यावर बनते एखादी कविता.
आणि कवीचं कवीपण तेव्हाच ज्यावेळी त्याची कविता केवळ त्याची न राहता तिचा आस्वाद घेणाऱ्या रसिकांची होऊन जाते..
या ब्लॉगवरील माझी प्रत्येक कविता तुम्हांला तुमच्या जवळची वाटावी, एवढीच सरस्वती मातेच्या चरणी प्रार्थना..

Thursday 19 November 2015

काव्यांजली (A Tribute to MUMBAI POLICE)



आठवणी घेऊन त्या भीषण
नकळत आसवे पुसतो आहे
आज प्रत्येक पोलिसात मी
त्या करकरेंना शोधतो आहे

अमानुषतेच्या विळख्यातून

महाराष्ट्र सुटला खरा
मानवता, एकतेचे उपचार घेऊन
जरी झाला थोडा बरा
विजयाच्या आनंदातही
निपचीत देह बघतो आहे

निष्पापांना मारण्यासाठी

जो भारतात आला
शेकडोंना मारणारा
शेवटी तळमळत मेला
त्याच्या गोळ्या छातीवर घेत
सग्यांना वाचवतो आहे

हल्ले करून आम्हांवर

आम्हां किती तुम्ही खचवणार ?
परकीयांचे हात धरून
आम्हां किती गप्प बसवणार ?
रात्रीच्या भयाण अंधारात
सूर्योदय आता मागतो आहे