शब्द म्हणजे कागदावर ओढलेल्या रेघोट्याच फक्त.
त्यामध्ये थोडीशी भावनांची शाई मिसळल्यावर बनते एखादी कविता.
आणि कवीचं कवीपण तेव्हाच ज्यावेळी त्याची कविता केवळ त्याची न राहता तिचा आस्वाद घेणाऱ्या रसिकांची होऊन जाते..
या ब्लॉगवरील माझी प्रत्येक कविता तुम्हांला तुमच्या जवळची वाटावी, एवढीच सरस्वती मातेच्या चरणी प्रार्थना..

Thursday, 29 October 2015

आठवण !

तू माझ्याहून दूर गेलीयेस
दृष्टीक्षेपातही नाहीयेस आता
तुझी चाहूलही येईनाशी झालीये
पण मला तुझी आठवण येत नाहीये !
आभाळ अगदी romantic झालंय
कोणी सोबत असावं, असं वाटण्याइतपत !
उत्तरांनासुद्धा प्रश्न पडलेत आता
पण मला तुझी आठवण येत नाहीये !
अगदी एकटाच पडलोय मीही
रिकामं अंगण चिडवतंय मला
एकेक ठोका डिवचत चाललाय खरा
पण मला तुझी आठवण येत नाहीये !
अगदी प्रामाणिकपणे तुला सांगावसं वाटतंय
की, मला तुझी आठवण येतच नाहीये !
कारण ‘आठवण’ अशाच गोष्टींची येऊ शकते,
ज्यांचा माणसाला ‘विसर’ पडतो !..
बरोबर ना?
मग आता तूही सांग,
तुला येतीये का गं …?
माझी आठवण !!!