शब्द म्हणजे कागदावर ओढलेल्या रेघोट्याच फक्त.
त्यामध्ये थोडीशी भावनांची शाई मिसळल्यावर बनते एखादी कविता.
आणि कवीचं कवीपण तेव्हाच ज्यावेळी त्याची कविता केवळ त्याची न राहता तिचा आस्वाद घेणाऱ्या रसिकांची होऊन जाते..
या ब्लॉगवरील माझी प्रत्येक कविता तुम्हांला तुमच्या जवळची वाटावी, एवढीच सरस्वती मातेच्या चरणी प्रार्थना..

Thursday, 12 November 2015

फटाके !

कल्लोळाचा देश आपला, आवाजाचं गाव
तुम्ही आम्ही दिवाळीचे फटाकेच ना राव !
ठिणग्या उडवत पसरणाऱ्या पावसासारखं कोणी
कोणी भिरभिर चक्कर – स्वतःभोवतीच गातं गाणी
फुलबाजीच्यासारखं कोणी पेटवून देणारं
कोणी seven shot – सातही सूर लावणारं
जितकं जास्त प्रदर्शन, तितकं मोठ्ठं नाव !
वात लावताच किंचाळणाऱ्या लवंगीसारखं कोणी
कोणी ताजमहाल – कोण्या बादशहाची राणी
कोणी ‘लक्ष्मी’ नाव ठेवून घात करणारं
कोणी सुतळी बांधून क्षणार्धात फुटणारं
आवाजाची पट्टी ठरवी प्रत्येकाचा भाव !
नागगोळी कोणी, काळा धूर सोडणारी
पानपट्टी – पेटवूनदेखील न पेटणारी
कोणी रॉकेट – जमीन सोडून आकाश व्यापणारं
क्षणभर तरी अंधाराशी भांडण करणारं
जन्म काय? अंधार – उजेडाचाच लपंडाव !