शब्द म्हणजे कागदावर ओढलेल्या रेघोट्याच फक्त.
त्यामध्ये थोडीशी भावनांची शाई मिसळल्यावर बनते एखादी कविता.
आणि कवीचं कवीपण तेव्हाच ज्यावेळी त्याची कविता केवळ त्याची न राहता तिचा आस्वाद घेणाऱ्या रसिकांची होऊन जाते..
या ब्लॉगवरील माझी प्रत्येक कविता तुम्हांला तुमच्या जवळची वाटावी, एवढीच सरस्वती मातेच्या चरणी प्रार्थना..

Thursday, 17 December 2015

थोडं बोललीस, उपकार झाले !



थोडं बोललीस, उपकार झाले
अगदी एवढंच हवं होतं !
जितकं बोललीस, मोजता येईल
तरी तेवढंच हवं होतं !!

थोडं बोललीस, उपकार झाले

अबोलपणा टोचत होता
एकटेपणा निघून गेला,
डोक्यावर जो नाचत होता !

थोडं बोललीस, उपकार झाले
केवढं सुंदर बोलतेस तू !
(काय बोललीस, ठाऊक नाही)
तरीदेखील कळतेस तू !

थोडं बोललीस, उपकार झाले
आता मला समजतंय
ओठ बोलतात तुझे
तरी डोळ्याचंच उमजतंय !

थोडं बोललीस, उपकार झाले
बोललो मीही तुझ्याशी
'हाय', 'बाय' ओठावर
अन् बाकी सारं मनाशी !

थोडं बोललीस, उपकार झाले
दोन्ही कान वापरले
दोन्हींमधून साठवलेले
आतल्या आत हरवले !

थोडं बोललीस, उपकार झाले
माहीत झालं मलाही
नशेत असतो माणूस तेव्हा
सुचत नाही जराही !

थोडं बोललीस, उपकार झाले
सुख होतं निसटलं 
आकाश पाताळ एक केलं 
शेवटी तुझ्यात सापडलं !

थोडं बोललीस, उपकार झाले
लक्षात ठेविल जमेल ते
निम्मं हृदय चेहऱ्यात गेलं 
निम्म्यामध्ये बसेल ते !

थोडं बोललीस, उपकार झाले
मुद्दा नव्हतं बोलण्याला
विषय नसतोच काही 
केवळ आशय असतो प्रेमाला !!

Thursday, 10 December 2015

ऑडी!!!



मला त्या रुंद ऑडीने तिचे ते मद्य पाजियले !
दिले मी कर्ज नेत्रांचेरूपाचे व्याज मागितले !
तिचा शृंगार मोठा ! घेऊनि हा ठाव हृदयाचा
नशिबानेच साल्या आणला मग आव उदयाचा !!

मला त्या रुंद ऑडीने तिचा तो रंग दाखवला
करी तेजासवे स्पर्धानभीचा सूर्यही जळला !
तिचे सौंदर्य बघताना म्हणालो 'मारवेमीही
madonna ला तिच्यामध्ये सुखाने गायली तीही !!

मला त्या रुंद ऑडीने तिचे बोनेट दाखवले
तिचा लोगोतिचे सारे दिवे माझ्यात साठवले !
तिचा नाजूक दरवाजा धन्यासाठी तिच्या सजला
तिच्या काचांतूनिही थंड ए.सी. स्पर्शिला मजला !!

अशी ऑडी, किती तो भाग्यशाली तीत बसणारा !
तिच्या जहारामुळे घायाळ होणाऱ्यांस हसणारा !
मला त्या रुंद ऑडीने दिले आठवून काहीही
तिच्या प्रेमात पडलो मी, तरी ती थांबली नाही !..

Thursday, 3 December 2015

सोबत तुझा नकार...


ओळखलंस का याला ? हा तो तू दिलेला नकार
एका शब्दात आकांक्षांची सरळसोट शिकार
तू दिलंस काहीतरी, म्हणून ठेवला जपून
आतल्या आत चिडून आणि वरती वरती हसून

माझ्याचकडे असतो हल्ली - आम्ही सोबत राहतो

एकमेकांच्या हातांवरच्या फाटक्या रेषा पाहतो
वाटत नाही एकटं एकटं, बोअर होत नाही
आता आम्ही एकमेकांशिवाय राहत नाही

घर, दार, बाजार, ऑफिस, निर्जन वाटेवर

हल्ली सगळीकडे असतो माझ्याच बरोबर
माझ्या इवल्या जगात मीही त्याला वागवतो
माझी दुःखे त्याच्यापाशी बोलून दाखवतो

मोकळं मोकळं वाटतं जरा, मन हलकं होतं

माझं रडणं त्याच्यासोबत शेअर करता येतं
नवनवीन विषयांवरती गप्पा मारत बसतो
तो फक्त ऐकतो आणि मी फक्त बोलतो

इतकं विश्वासार्ह आधी भेटलंच नव्हतं कोणी

इतकं आपुलकीने कधी वागलंच नव्हतं कोणी
त्याचा जळता हात धरून हळूहळू चालतो आहे
भस्म होतोय आनंदाने, खरं जगणं जगतो आहे

नकार दिलास तू, म्हणून इतकं शिकलो मी

भिडलं कोणी खोल, म्हणून घडू शकलो मी
उपकार झाले, मानला तुझा दातृत्वाचा प्रकार
दिगंताची वाट माझी - सोबत तुझा नकार ..