शब्द म्हणजे कागदावर ओढलेल्या रेघोट्याच फक्त.
त्यामध्ये थोडीशी भावनांची शाई मिसळल्यावर बनते एखादी कविता.
आणि कवीचं कवीपण तेव्हाच ज्यावेळी त्याची कविता केवळ त्याची न राहता तिचा आस्वाद घेणाऱ्या रसिकांची होऊन जाते..
या ब्लॉगवरील माझी प्रत्येक कविता तुम्हांला तुमच्या जवळची वाटावी, एवढीच सरस्वती मातेच्या चरणी प्रार्थना..

Thursday, 26 November 2015

आपण (?)




बरं झालं..

आपण एकमेकांना जाणून घ्यायच्या फंदात पडलो नाही...
ह्या जमान्यात वेळ तरी कुठंय - एखाद्या व्यक्तीला जाणून घ्यायला ?
एखाद्या व्यक्तीची वाट बघायला ?
एखाद्या व्यक्तीला पत्र लिहायला ?
आपल्या बोटांनी टाईप केलं की पोहोचतंच न समोरच्या डोळ्यांमध्ये ?
मग पत्रं कशाला लिहायची ?

वाट कशाला पाहायची ?

नेटवरून आतापर्यंत किती किती बोललो !
किती मेसेजेस वाचलेकिती डिलीट झाले !
किती smileys पाठवल्याकिस्से share केले

एकमेकांचे सारे ज्ञान एकमेकांना दिले 

पण नातं जेव्हा hang झालं, एक लक्षात आलं
की 'मन सामावणारंनेट आलं नाहीये अजून !
संवादांची range गेलीतेव्हा कळून चुकलं 

की 'भावनांपेक्षा fast' नेट झालं नाहीये अजून !

तुलाही हे कळावं अशी अपेक्षा नव्हती माझी
तुलाही हे कळेलअशी भाबडी आशा होती 
पण तुझं नेट वेगळं - माझं नेट वेगळं !
I mean, तुझं विश्व वेगळं - माझं विश्व वेगळं !
म्हणून,
बरं झालं..

आपण एकमेकांना जाणून घ्यायच्या फंदात पडलो नाही...

Thursday, 19 November 2015

काव्यांजली (A Tribute to MUMBAI POLICE)



आठवणी घेऊन त्या भीषण
नकळत आसवे पुसतो आहे
आज प्रत्येक पोलिसात मी
त्या करकरेंना शोधतो आहे

अमानुषतेच्या विळख्यातून

महाराष्ट्र सुटला खरा
मानवता, एकतेचे उपचार घेऊन
जरी झाला थोडा बरा
विजयाच्या आनंदातही
निपचीत देह बघतो आहे

निष्पापांना मारण्यासाठी

जो भारतात आला
शेकडोंना मारणारा
शेवटी तळमळत मेला
त्याच्या गोळ्या छातीवर घेत
सग्यांना वाचवतो आहे

हल्ले करून आम्हांवर

आम्हां किती तुम्ही खचवणार ?
परकीयांचे हात धरून
आम्हां किती गप्प बसवणार ?
रात्रीच्या भयाण अंधारात
सूर्योदय आता मागतो आहे

Thursday, 12 November 2015

फटाके !

कल्लोळाचा देश आपला, आवाजाचं गाव
तुम्ही आम्ही दिवाळीचे फटाकेच ना राव !
ठिणग्या उडवत पसरणाऱ्या पावसासारखं कोणी
कोणी भिरभिर चक्कर – स्वतःभोवतीच गातं गाणी
फुलबाजीच्यासारखं कोणी पेटवून देणारं
कोणी seven shot – सातही सूर लावणारं
जितकं जास्त प्रदर्शन, तितकं मोठ्ठं नाव !
वात लावताच किंचाळणाऱ्या लवंगीसारखं कोणी
कोणी ताजमहाल – कोण्या बादशहाची राणी
कोणी ‘लक्ष्मी’ नाव ठेवून घात करणारं
कोणी सुतळी बांधून क्षणार्धात फुटणारं
आवाजाची पट्टी ठरवी प्रत्येकाचा भाव !
नागगोळी कोणी, काळा धूर सोडणारी
पानपट्टी – पेटवूनदेखील न पेटणारी
कोणी रॉकेट – जमीन सोडून आकाश व्यापणारं
क्षणभर तरी अंधाराशी भांडण करणारं
जन्म काय? अंधार – उजेडाचाच लपंडाव !

Thursday, 5 November 2015

भारतमातेसोबतची बोलणी

भारतमातेसोबत आमची बोलणी सुरु आहेत
तिला म्हणे दहशतवाद्यांना मोठ्ठी शिक्षा द्यायचीये
राजकारणाचे कारण तिला अजून समजलेले नाही
वशिल्यांच्या जत्रेमध्येच ती हरवली आहे
इथल्या खेड्यांसाठी ती हमसून हमसून रडते
तिच्या अश्रूंशिवाय तिथे पाणीच दिसत नाही
तिचे नेते स्विस बँकेत तिलाच गहाण ठेवतात
तिचा जयजयकार फक्त सभांपुरताच राहतो
एरवी तिला कोणी कुत्रेसुद्धा विचारत नाही
तसे विचारण्यासारखे तिच्याकडे आहे तरी काय?
थोडी जमीन, दऱ्याखोऱ्या आणि खूप सारा काळा धूर…
भारतमातेसोबत आमची बोलणी सुरु आहेत
तिला म्हणे गरिबांसाठी स्वतः सुंदर बनायचंय
शेतकऱ्यांच्या मातीवर चालवायचाय सोन्याचा नांगर
आणि सोनं पिकवून तिला पुन्हा सोन्याचा धूर बघायचाय
अरे, ज्यांचे व्याजाशिवाय दुसरे काहीच वाढत नाही
अशी कर्जबाजारी माणसं म्हणे तिला हसताना पाहायचीयेत
ज्यांना सरकार विषाशिवाय दुसरे काहीच देत नाही
अशा शेतकऱ्यांच्या हातात तिला खेळवायचेत रोख पैसे
जरी मोठ्या बाता मारते आमची भारतमाता,
खर्चण्यासाठी तिच्याकडे असे आहे तरी काय?
थोडी जमीन, दऱ्याखोऱ्या आणि खूप सारा काळा धूर…
भारतमातेसोबत आमची बोलणी सुरु आहेत
तिच्या डोळ्यांत लोकांसाठी बरीच स्वप्ने होती
तिचा आरोप – आपण धूळ फेकली त्याच डोळ्यांत
तिची व्यथा – इथे तिला गरिबी बघवत नाही
तिचे दुःख – तिला काहीच बदलता येत नाही
तिचा राग – तिला व्यक्तच करता येत नाही
ती म्हणाली, प्रगतीच्या बदल्यात ती काहीही देईल आम्हांला
पण देण्यासारखे तिच्याकडे असे आहे तरी काय?
थोडी जमीन, दऱ्याखोऱ्या आणि खूप सारा काळा धूर…