छडी
नजरेपुढे कठोर होते, नजरेआडून पाझरते
सर, तुमची छडी अजून भविष्याला सावरते
पुस्तकांची हाक येते दप्तराच्या कंठातून
संस्कारांच्या कंपासपेटीत आयुष्याला सामावून
शिष्य म्हणून, युवक म्हणून, 'माणूस' म्हणून घडवते
तेव्हा तुम्ही बाकावरती उभं केलं नसतं जर
विचारांची पोहोच कधी गेली नसती ध्येयावर
अडथळ्यांचा डोंगर एका क्षणामध्ये झुकवते
आठवणींच्या फळ्यावरती अजून आहेत सुविचार
शिस्तीच्या त्या गणिताला ममत्वाचा गुणाकार
नजरेमध्ये सूर्य घेऊन आभाळ व्हायला शिकवते
No comments:
Post a Comment