किनारा
किनाऱ्याला नसतो अंदाज
समुद्राच्या लांबी - रुंदी - खोलीचा
किनाऱ्याला नसते जाण
समुद्राच्या स्वच्छ - अस्वच्छपणाची
तो नाही करत हिशोब
आल्या गेलेल्या नव्या जुन्या रेतीचा
त्याला नसते चिंता
समुद्राने निरंतर लादलेल्या
त्याच्या खारटपणाची
समुद्राच्या भरतीत तो बुडून जातो
आणि ओहोटीत मोकळा होतो
समुद्राला भेटायला येणाऱ्या प्रत्येकाचे
एखाद्या गृहलक्ष्मीप्रमाणे तो स्वागत करतो
एका मिठीपुरती का भेटेना,
पण प्रत्येक लाट त्याने कोरलेली असते आपल्या अंगावर
जिला निरोप देताना तो अक्षरशः
स्वतःमधले कण देऊ करतो !
आपण जातो मग त्याला सावरायला म्हणून
पण तो मात्र आणखीनच खोल धसत राहतो
घोंघावत राहतो वारा किनाऱ्याला समजावत
की या पाण्याचा खेळ चाललाय आभाळ होण्यासाठी
किनाराही म्हणतो, 'मला समुद्राचा नाद
यावी लाट, मग ती असो केवळ एका क्षणासाठी..'
No comments:
Post a Comment