ही कविता मला सुचली
त्या गजबजलेल्या A.T.M. मध्ये !
आणि तिला दिली दाद
एका अशा यंत्राने,
ज्याच्याकडे देण्यासाठी दुसरे काहीच नव्हते
-अगदी पैसेही !..
विनवणी करून पहिली मी त्याला !
म्हटलो, 'अरे खिशात आता दमडासुद्धा शिल्लक नाही
पोटापाण्यापुरती तरी कृपा करशील का?'
त्यावर तेही 'सेंटी' झालं
आणि दिल्या काढून लगेच
कोऱ्याकरकरीत 'शुभेच्छा' !
बोललं, "आता पोटात माझ्या नोटा काही शिल्लक नाहीत
मात्र मनामधून थोड्या शुभेच्छा तर देऊ शकतो
जगण्यासाठी तुला..
तुम्हां माणसांमध्ये तशी शुभेच्छांना किंमत नसेल
पण एकदा शुभेच्छा या स्वतःसाठी खर्चून बघ !
नोटांसोबत मैत्री केलीस, शेवटी त्यांनी दगा दिला
मी म्हणतोय म्हणून आता शुभेच्छाही वापरून बघ !!"
A.T.M. च्या दारामधून बाहेर पडत होतो तेव्हा
हिरमुसलेली रांग सारी भविष्यातला सूर्योदय
लख्ख उजळून देण्यासाठी आज एका अंधारलेल्या
काळ्याकुट्ट क्षणामधून सावरू पाहत होती
A.T.M. ने मनापासून दिलेल्या त्या शुभेच्छांना
देशासाठी धडधडणाऱ्या सहनशील काळजामध्ये
आपल्या आपल्या पद्धतीने घेऊन जात होती...
ही कविता मला सुचली
त्या गजबजलेल्या A.T.M. मध्ये..
आणि तिला दिली दाद
एका अशा यंत्राने,
ज्याच्याकडे देण्यासाठी दुसरे काहीच नव्हते
-अगदी पैसेही...
No comments:
Post a Comment