शब्द म्हणजे कागदावर ओढलेल्या रेघोट्याच फक्त.
त्यामध्ये थोडीशी भावनांची शाई मिसळल्यावर बनते एखादी कविता.
आणि कवीचं कवीपण तेव्हाच ज्यावेळी त्याची कविता केवळ त्याची न राहता तिचा आस्वाद घेणाऱ्या रसिकांची होऊन जाते..
या ब्लॉगवरील माझी प्रत्येक कविता तुम्हांला तुमच्या जवळची वाटावी, एवढीच सरस्वती मातेच्या चरणी प्रार्थना..

Thursday, 29 October 2015

आठवण !

तू माझ्याहून दूर गेलीयेस
दृष्टीक्षेपातही नाहीयेस आता
तुझी चाहूलही येईनाशी झालीये
पण मला तुझी आठवण येत नाहीये !
आभाळ अगदी romantic झालंय
कोणी सोबत असावं, असं वाटण्याइतपत !
उत्तरांनासुद्धा प्रश्न पडलेत आता
पण मला तुझी आठवण येत नाहीये !
अगदी एकटाच पडलोय मीही
रिकामं अंगण चिडवतंय मला
एकेक ठोका डिवचत चाललाय खरा
पण मला तुझी आठवण येत नाहीये !
अगदी प्रामाणिकपणे तुला सांगावसं वाटतंय
की, मला तुझी आठवण येतच नाहीये !
कारण ‘आठवण’ अशाच गोष्टींची येऊ शकते,
ज्यांचा माणसाला ‘विसर’ पडतो !..
बरोबर ना?
मग आता तूही सांग,
तुला येतीये का गं …?
माझी आठवण !!!

Thursday, 22 October 2015

माझं पहिलं प्रेमपत्र..


हे घे, माझं पहिलं प्रेमपत्र …
याआधीच देणार होतो, पण वाटलं की मी घाई करतोय
नंतर लक्षात आलं की मी कितीही उशीर केला
तरी तुला ती घाईच वाटणार आहे !
म्हणून आत्ताच घे, माझं पहिलं प्रेमपत्र …

या प्रेमपत्राची केवळ दोनच उत्तरे असू शकतात
‘हो’ किंवा ‘नाही’
‘नंतर बघू’, ‘विचार करेन’ वगैरे sophisticated bandages वापरू नकोस
‘Yes’ or ‘No’ यापैकीच एक हत्यार वापरण्याची परवानगी देणारं
हे घे, माझं पहिलं प्रेमपत्र …

तुला वाटेल, मी खूपच straight forward आहे
पण खरं सांगतो, तूच मला तसं व्हायला लावलंस
ह्या straight forward प्रेमपत्राच्या आधी
कितीतरी अलंकारिक प्रेमपत्रं
हृदयाच्या कोपऱ्यात तुला देण्यासाठी मी जपून ठेवली आहेत
किंबहुना तुझ्या सावलीला ती वाचूनही दाखवलीयेत
पण तुझ्याकडून त्यांचे उत्तर काही आले नाही
[अर्थात त्याचा दोष मी तुला अथवा तुझ्या सावलीला
मुळीच देणार नाही
(खरं तर प्रेमात दोषारोपाला जागाच नसावी)]
आणि तारुण्याच्या प्रवाहाशेजारी
आशेच्या खडकावर बसून
‘She loves me, she loves me not’ चा जयघोष करत
पाकळ्या खुडत गुलाबाचा जीव घेणं
मला परवडणारं नाही
म्हणून भावनांच्या पाकळ्या एकत्र करून
कृत्रिम का होईना, पण गुलाब झालेले शब्द
गुलाब समजूनच स्वीकार, असं म्हणणारं
हे घे, माझं पहिलं प्रेमपत्र…

नाही म्हणावंस, असं वाटत नाही
कारण हृदय साबणाच्या बुड्बुड्यासारखं आहे
घोंघावत्या वाऱ्यात कधी फुटलं कळणार नाही
नाही म्हणशील, असंही वाटत नाही
त्याचं कारण सांगणार नाही
पण हो म्हणावंस, हेही पटतंय
आणि हो म्हणशील, हेही वाटतंय
सकारात्मक भावनांनी सकारात्मक भावनांना
सकारात्मक उत्तराच्या अपेक्षेनं लिहिलेलं
हे घे, माझं पहिलं प्रेमपत्र …