शब्द म्हणजे कागदावर ओढलेल्या रेघोट्याच फक्त.
त्यामध्ये थोडीशी भावनांची शाई मिसळल्यावर बनते एखादी कविता.
आणि कवीचं कवीपण तेव्हाच ज्यावेळी त्याची कविता केवळ त्याची न राहता तिचा आस्वाद घेणाऱ्या रसिकांची होऊन जाते..
या ब्लॉगवरील माझी प्रत्येक कविता तुम्हांला तुमच्या जवळची वाटावी, एवढीच सरस्वती मातेच्या चरणी प्रार्थना..

Saturday, 16 July 2016

व्यसनाधीन .. तुझ्या डोळ्यांच्या ...


ही कसली जादू ? कसली धुंदी ? तारे गाती !
तू नाहीस आली, मी एकाकी हळव्या राती
स्वतःचाही कुठे उरतो मी शेवटी ?
चंद्राच्या साक्षीने होतो मी शेवटी 
व्यसनाधीन .. तुझ्या डोळ्यांच्या ... 
व्यसनाधीन .. तुझ्या डोळ्यांच्या ... 

मी झुरतो आहे आठवणींच्या नाजुक विश्वामध्ये 
का छळते आहे सखये इतुकी मदनाला दमनामध्ये ?
ये आता साऱ्या मर्यादांना ठेऊन मागे 
घे जुळवून आणि दोन मनांशी रेशीमधागे 
हृदयाची मागणी करतो मी शेवटी 
चंद्राच्या साक्षीने होतो मी शेवटी 
व्यसनाधीन .. तुझ्या डोळ्यांच्या ... 
व्यसनाधीन .. तुझ्या डोळ्यांच्या ... 

तू येशील जेव्हा, होशील जेव्हा कवितेची आशयवाणी, 
मी गाईन तेव्हा तू नसताना भिजलेली माझी गाणी 
का आकाशाने क्षितिजाच्याही पास नसावे ?
का प्रेम असुनही माझ्याहून तू दूर असावे ?
सजणाच्या अंगणी तू यावे शेवटी 
चंद्राच्या साक्षीने मी व्हावे शेवटी 
व्यसनाधीन .. तुझ्या डोळ्यांच्या ... 
व्यसनाधीन .. तुझ्या डोळ्यांच्या ... 

Friday, 8 April 2016

Pratik Dumbre Live - एक सेल्फी!!!

एकविसाव्या शतकामध्ये वावरताना त्याच्यासोबत एक सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही मला... 
 हाच एकविसाव्या शतकासोबत काढलेला सेल्फी कवितेच्या स्वरूपात मांडतोय तुमच्यापुढे.. 
कसा वाटतोय ते नक्की कळवा..



Wednesday, 23 March 2016

आम्ही होळी करतो...


कट्ट्यावरच्या गप्पा विणत फाटकी झोळी करतो
संस्कारांच्या नैवेद्याची आम्ही होळी करतो

सुट्ट्या मिळतात म्हणून आमचे सण गोड सारे
सणांमागच्या उद्देशांचे दोर फोल सारे
अज्ञानाचे पुरण घालून पुरणपोळी करतो

गणेशोत्सव - डॉल्बीपुढे धुंद होण्यासाठी
शिवजयंती - वर्षात दोनदा राजे स्मरण्यासाठी
'अमुक मित्र मंडळ' काढून फसवी टोळी करतो

दिवाळीला फटाक्यांची आतषबाजी असते
धुळवड आमची सर्वांगाचा रंगच काढून नेते
प्रदूषणाने आमची माती कुट्ट काळी करतो

आमच्या येथे प्रत्येक सण नेहमी साजरा होतो
फक्त त्याचे कारण तेवढे आम्ही विसरून जातो
पाश्च्यात्यांची दुर्गुण - आरास 'मराठमोळी' करतो

Friends, please respect our festivals. Each one of them has a specific meaning.
Understand and Celebrate. Love the country.. Love the festivals..
Be proud to be an Indian