आठवणी घेऊन त्या भीषण नकळत आसवे पुसतो आहे आज प्रत्येक पोलिसात मी त्या करकरेंना शोधतो आहे अमानुषतेच्या विळख्यातून महाराष्ट्र सुटला खरा मानवता, एकतेचे उपचार घेऊन जरी झाला थोडा बरा विजयाच्या आनंदातही निपचीत देह बघतो आहे निष्पापांना मारण्यासाठी जो भारतात आला शेकडोंना मारणारा शेवटी तळमळत मेला त्याच्या गोळ्या छातीवर घेत सग्यांना वाचवतो आहे हल्ले करून आम्हांवर आम्हां किती तुम्ही खचवणार ? परकीयांचे हात धरून आम्हां किती गप्प बसवणार ? रात्रीच्या भयाण अंधारात सूर्योदय आता मागतो आहे
कल्लोळाचा देश आपला, आवाजाचं गाव तुम्ही आम्ही दिवाळीचे फटाकेच ना राव !
ठिणग्या उडवत पसरणाऱ्या पावसासारखं कोणी कोणी भिरभिर चक्कर – स्वतःभोवतीच गातं गाणी फुलबाजीच्यासारखं कोणी पेटवून देणारं कोणी seven shot – सातही सूर लावणारं जितकं जास्त प्रदर्शन, तितकं मोठ्ठं नाव !
वात लावताच किंचाळणाऱ्या लवंगीसारखं कोणी कोणी ताजमहाल – कोण्या बादशहाची राणी कोणी ‘लक्ष्मी’ नाव ठेवून घात करणारं कोणी सुतळी बांधून क्षणार्धात फुटणारं आवाजाची पट्टी ठरवी प्रत्येकाचा भाव !
नागगोळी कोणी, काळा धूर सोडणारी पानपट्टी – पेटवूनदेखील न पेटणारी कोणी रॉकेट – जमीन सोडून आकाश व्यापणारं क्षणभर तरी अंधाराशी भांडण करणारं जन्म काय? अंधार – उजेडाचाच लपंडाव !
भारतमातेसोबत आमची बोलणी सुरु आहेत तिला म्हणे दहशतवाद्यांना मोठ्ठी शिक्षा द्यायचीये राजकारणाचे कारण तिला अजून समजलेले नाही वशिल्यांच्या जत्रेमध्येच ती हरवली आहे इथल्या खेड्यांसाठी ती हमसून हमसून रडते तिच्या अश्रूंशिवाय तिथे पाणीच दिसत नाही तिचे नेते स्विस बँकेत तिलाच गहाण ठेवतात तिचा जयजयकार फक्त सभांपुरताच राहतो एरवी तिला कोणी कुत्रेसुद्धा विचारत नाही तसे विचारण्यासारखे तिच्याकडे आहे तरी काय? थोडी जमीन, दऱ्याखोऱ्या आणि खूप सारा काळा धूर…
भारतमातेसोबत आमची बोलणी सुरु आहेत तिला म्हणे गरिबांसाठी स्वतः सुंदर बनायचंय शेतकऱ्यांच्या मातीवर चालवायचाय सोन्याचा नांगर आणि सोनं पिकवून तिला पुन्हा सोन्याचा धूर बघायचाय अरे, ज्यांचे व्याजाशिवाय दुसरे काहीच वाढत नाही अशी कर्जबाजारी माणसं म्हणे तिला हसताना पाहायचीयेत ज्यांना सरकार विषाशिवाय दुसरे काहीच देत नाही अशा शेतकऱ्यांच्या हातात तिला खेळवायचेत रोख पैसे जरी मोठ्या बाता मारते आमची भारतमाता, खर्चण्यासाठी तिच्याकडे असे आहे तरी काय? थोडी जमीन, दऱ्याखोऱ्या आणि खूप सारा काळा धूर…
भारतमातेसोबत आमची बोलणी सुरु आहेत तिच्या डोळ्यांत लोकांसाठी बरीच स्वप्ने होती तिचा आरोप – आपण धूळ फेकली त्याच डोळ्यांत तिची व्यथा – इथे तिला गरिबी बघवत नाही तिचे दुःख – तिला काहीच बदलता येत नाही तिचा राग – तिला व्यक्तच करता येत नाही ती म्हणाली, प्रगतीच्या बदल्यात ती काहीही देईल आम्हांला पण देण्यासारखे तिच्याकडे असे आहे तरी काय? थोडी जमीन, दऱ्याखोऱ्या आणि खूप सारा काळा धूर…