शब्द म्हणजे कागदावर ओढलेल्या रेघोट्याच फक्त.
त्यामध्ये थोडीशी भावनांची शाई मिसळल्यावर बनते एखादी कविता.
आणि कवीचं कवीपण तेव्हाच ज्यावेळी त्याची कविता केवळ त्याची न राहता तिचा आस्वाद घेणाऱ्या रसिकांची होऊन जाते..
या ब्लॉगवरील माझी प्रत्येक कविता तुम्हांला तुमच्या जवळची वाटावी, एवढीच सरस्वती मातेच्या चरणी प्रार्थना..

Thursday 21 January 2016

युध्दसोहळा !!


रणात जातो, डंख मारतो, गर्व ठेवतो पंखांचा !
युद्धसोहळा संध्याकाळी घरात भरतो डासांचा !!

असा शूर प्रत्येक जीव तो निधडा होऊन लढत असे
अशी तयाची तीक्ष्ण नजर, सर्वत्र तयाला लक्ष्य दिसे
रक्त शोषणे धर्म तयाचा, अधीश तो तव वासांचा !!

म्हणे न कोणी तयास पक्षी, तरी असे उड्डाणपटू
असा चकवतो हात मानवी, जणू पावली इंद्रधनू
दिसे आपणा जरी, प्रयत्न व्यर्थ तया पकडायाचा !!

हार तयाला ठाऊक नाही, अलगद येतो जवळ जरा
समान देतो जगा वेदना, तोच असे निरपेक्ष खरा
असे शून्य उपयोग आपल्या धमक्यांचा नि धाकाचा !!

असे डास, बिनविरोध ज्यांना अधमाने निवडून दिले
रक्त शोषूनि छळणारे पृथ्वीवरही कलियुग आले
एक सांगणे - असा गुण आपल्या न असे उपयोगाचा

जरी चिरडती तयास सारे, ध्येय तयाचे एक असे
तयास ना भय मृत्यूचे अन् अन्य न कुठला नाद असे
एक शिकावे - ध्येयापुढती हट्ट नसावा श्वासांचा 

Thursday 14 January 2016

सज्ज व्हा..


काळजाला कापणाऱ्या दूषणांनो - सज्ज व्हा
सज्ज व्हा ! रुधिरास जडल्या शृंखलांनो - सज्ज व्हा

चालण्यासाठी न मर्यादा इथे आहे आम्हां
हद्दरेषा सांगणाऱ्या सज्जनांनो - सज्ज व्हा

आज आम्ही हारलो, माघारलो नाही कधी
दाखवा रोखून आम्हां, वादळांनो - सज्ज व्हा

आजच्या राखेत सामावे उद्याचा फैसला
आणखी आघात देण्या वेद्नांनो - सज्ज व्हा

Thursday 7 January 2016

कलंदर


सर्व वाटांतून आम्ही चाललो भटकत कधी
फार ओझे जड म्हणुनी दूर ते झटकत कधी
ना आम्हां चिंता टीकांची, ना उद्याची काळजी
वल्गनांना भीक आम्ही घातली नाही कधी

पाहुनी आम्हांस, अपयश जीव धरुनि धावते
कापते लटलट - जणू स्वर आर्जवाचा लावते
अंतराचे ऐकुनि, बाहेरचे दुखवत कधी
अपयशाला भीक आम्ही घातली नाही कधी

पर्वताला स्पर्शिता तो शिखर कापून ठेवतो
अन् निघाया पार त्याच्या वाट आम्हां दावतो
वेगळ्या धुंदीत त्याच्या सावल्या चुकवत कधी
अडथळ्यांना भीक आम्ही घातली नाही कधी 

वाहत्या वाऱ्यास आम्ही ह्या मुठीने रोखतो
तप्त अग्नीलाही आमची नजर टाकुन जाळतो
पोहुनि उलट्या प्रवाही, पूरही अडवत कधी
संकटांना भीक आम्ही घातली नाही कधी

जे जसे आयुष्य आले, ते न आम्ही लोटले
आमच्या नशिबासही आमच्या तऱ्हेने थाटले
तळपत्या ज्वाळा टीकांच्या फेकल्या विझवत कधी
प्राक्तनाला भीक आम्ही घातली नाही कधी